चांगले जीवन जगण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी या सवयी सोडून द्या.
प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची इच्छा असते. मग ते कोणतेही क्षेत्र असो. यशस्वी होण्यासाठी काही सवयी आत्मसात कराव्या लागतात तर काही सवयी सोडून द्याव्या लागतात. सवयी ह्या चांगल्या तसेच वाईट असतात जर वाईट सवयी सोडल्या तर अर्थातच चांगल्या सवयी शिल्लक राहतात व आपले जीवन अर्थातच यशस्वी करतील.
१. इतरांशी तुलना करणे : असे म्हणतात इतरांशी तुलना करणे आत्मघात. हो हे खरे आहे. जेव्हा आपण इतरांशी तुलना करतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण द्वेष, मत्सर, राग इत्यादी वाईट गुणांना थारा देतो. जेव्हा आपण इतरांशी तुलना करतो तेव्हा आपण स्वतःच्या जीवनावर दया दाखवत असतो. स्वतःकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलतो.
२. अतिविचार नको : अतिविचार आपले सुख व समाधान हिरावून घेते. जेव्हा आपण अतिविचार करतो तेव्हा आपण भूतकाळ व भविष्यकाळ च्या चक्रव्युहात अडकून पडतो. जे आपल्या हातात नसते. अतिविचार आपल्याला सहज नकारार्थी विचार करण्यास प्रवृत्त करतात. अतिविचाराने आपली कार्यक्षमता मंदावते.
३. अतिराग : राग नैसर्गिक असतो परंतु अतिराग हा राक्षस आहे. असे म्हणतात ‘अति राग भिक’. अतिरागाने आपण आपल्या विनाशाला आमंत्रित करत असतो. एका सेकंदाच्या रागाने विनाश ओढवल्याचे अनेक उदाहरण आहेत. राग नियंत्रित करण्यासाठी योग, व्यायाम व ध्यान याचा अवलंब करावा.
४. हट्टीपणा – आपला शत्रू : हे खरे आहे काही लोकांना सर्वच काम आपल्या मनासारखे व्हावे असे वाटते. यातून हट्टीपणाची भावना प्रगत होते. जे होते ते स्वीकारणे म्हणजे समाधान. ध्येयवादी व्हावे, परंतु अति ध्येयवादी होणे घातक आहे.
५. बदलाला विरोध नको : बदल हा निसर्गाचा नियम आहे. काही गोष्टी बदलणे आवश्यक आहे. बदल स्वीकारायलाच हवा. काळानुसार आपण बदलणे आवश्यक असते. त्यामध्ये आपले भले असते. या बद्लात आपली जीवनशैली, व्यवहार, आचार, विचार, सवयी ह्या गोष्टींचा अंतर्भूत होतो.
६. स्वतःबद्दल नकारार्थी विचार : ही एक अतिशय वाईट सवय आहे. जेव्हा आपण आपल्या मेंदूला नकारार्थी विचारांचे खाद्य पुरवतो तेव्हा संपूर्ण शरीर नकारार्थी देहबोली स्वीकारते, त्यामुळे आपल्यातील सकारात्मकता संपते व आपले जीवन दुख:मय होऊ शकते.
७. अपयशाची भावना जपणे: अपयश व यश हे जीवनाचे प्रमुख अंग आहेत. प्रत्येक वेळी यश मिळते असे नाही, कार्य करत राहणे हेच यशाचे गमक आहे. आपण अपयशी होऊ असे कधीच विचार करू नये. असे विचार आपल्याला दुर्बल बनवतात.
८. नकारार्थी विचाराचे मित्र : संगत रंगत आणते असे म्हणतात. जर आपल्या सोबत सकारात्मक विचाराचे मित्र असतील तर ती सकारात्मकता आपल्याला येते. सकारात्मक विचारांचे मित्र आपणास लाभदायक असतात कारण ते आपणास आशावादी बनवतात व आपणास नकारार्थी विचार करण्यापासून दूर करतात.